अष्टविनायक दर्शन यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी
अष्टविनायक दर्शन | अष्टविनायक दर्शन शास्त्रीय पद्धतीने कसे करावे ?
![]() |
अष्टविनायक दर्शन परिचय
गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. पूजनामध्ये गणपतीला पहिले स्थान दिलेले आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गणपतीचे पूजन करूनच करतात, कारण ते कार्य करताना कोणतेही विघ्न,बाधा न येता पूर्णत्वास जावे म्हणून गणपतीचे पूजन करून त्याचे शुभ आशीर्वाद घेतले जातात. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे आहेत. ह्या आठही मंदिरांची स्थापना निसर्गरम्य अशा ठिकाणी झालेली आहे. सध्याचे धावपळीचे आयुष्य जगत असताना या आठ गणपतीच्या मंदिरांना भेट दिल्यास आपल्या मनाला शांती आणि समाधान लाभते.
अष्टविनायक म्हणजे ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांना मिळून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपले दैवत गणपती होय. कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी लागते. कारण सर्व देवतांनी मिळून गणपतीला पूजेचा पहिला मान दिलेला आहे. विद्येची देवता गणपती आपल्या सर्व विघ्नांना दूर करते आणि यश समृद्धी प्रदान करते. ह्या आठही मंदिरे नैसर्गिक व रम्यमान जागेत वसलेली असून त्यांची स्थापत्यकला अतिशय सुंदर आणि मनाला सुखद अनुभव देतात.
अष्टविनायक दर्शन यात्रा म्हणजे ८ वेगवेगळ्या प्राचीन पवित्र गणपतींचे दर्शन करणे हे होय. आणि या प्रत्येक मंदिरांचा एक स्वतंत्र इतिहास असून त्यासोबत जोडलेली त्यांच्या कथा आहेत. आणि ह्या सर्व कथांची माहिती तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मुर्त्या विलक्षण आहेत. या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची रचना ही एकमेकांपासून वेगळी आहे. अशी प्रथा आहे की अष्टविनायक दर्शन यात्रा पूर्णत्वास नेण्याकरिता सर्व आठही गणपतींचे दर्शन घेऊन झाल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे लागते. या प्रत्येक आठही मंदिरातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत असल्याचे मानले जाते. मोरश्वर मंदिर, महागणपती मंदिर, चिंतामणी मंदिर, गिरिजात्मक मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, बल्लाळेश्वर मंदिर आणि वरद विनायक मंदिर अशी ही विविध गणपतीची मंदिरे आहेत.
ही मंदिरे मोरगांव, रांजणगांव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महाड येथे असून ती पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात स्थित आहेत. या आठ मंदिरांपैकी सहा मंदिरे पुणे जिल्ह्यात आणि दोन मंदिरे ही रायगड जिल्ह्यात असली तरी पुण्याहून जवळ पडतात.
अष्टविनायक दर्शन शास्त्रोक्त पद्धतीने खाली दिलेल्या क्रमवारीत
१ मोरेश्वर मंदिर-मोरगाव
![]() |
अष्टविनायक दर्शन यात्रेतील पहिला मानाचा गणपती, श्री मोरेश्वर अष्टविनायक गणपती मंदिर मोरगाव अष्टविनायक मंदिरांपैकी एक असून महाराष्ट्रातील सर्वात मोठे अष्टविनायक मंदिर आहेत. पुणे - सोलापूर महामार्गावरील बारामती तालुक्यातील मोरगाव गावातील कऱ्हा नदीकाठी पुण्यापासून ७८ किलोमीटर अंतरावर श्री मोरेश्वर गणपती मंदिर आहे. चौफुल्या पासून २३ किमीचे मोरगावचे अंतर आहे. अनेक गावांची नावे हि त्याठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे दिली जातात, तसेच काहीसे मोरगाव गावाच्या बाबतीत आहे. त्या गावाचा आकार मोरासारखा असून मोरांचे वास्तव्य या गावात मोठ्या प्रमाणात आहे.
बहामनी राजवटीत काळ्या दगडाचा वापर करून बांधण्यात आलेल्या मोरेश्वर मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर गणपतीच्या विविध युगांतील अवतारांची चित्रे दिसतात. मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले. हे मंदिर गावाच्या मध्यभागी असून मंदिराला चार मनोरे आहेत. मोगल काळातील मंदिरावर हल्ला रोखण्यासाठी मंदिराची रचना मशिदीसारखी केले गेली असावी.या मंदिराभोवती ५० फूट लांब भिंत तटबंदीसाठी बांधलेली आहे.
मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा दिसतात, मंदिरात प्रवेश केल्यावर समोर सहा फुटी मूषकाची आणि नंदीची दगडी मूर्ती बसलेली दिसते. शिव मंदिरांसमोर नंदीची मूर्ती असते, परंतु गणपती सामोरे बसलेल्या नंदीची मूर्ती हे असे चित्र फक्त याच मंदिरात पाहायला मिळते.
मयूरेश्वराच्या रूपाने मोरावरस्वार असलेल्या गणेशमूर्तीने या भागात सिंधुरा सूर या राक्षसाचा वध केला असा विश्वास आहे. या मंदिरातील स्वयंभू गणेशाची सोंड डाव्या बाजूस वळलेली आहे आणि मूर्तीच्या डोळ्यांत आणि बेबीत हिरे बसवलेले आहेत, नागराजाचे संरक्षण छत्र पाहायला मिळते. मूर्तीच्या दोनी बाजूस रीद्धी (शक्ती) आणि सिद्धी (बुद्धी ) यांच्या पितळेच्या प्रतिमा असून पुढे मयुर आणि मूषक आहेत.
असे म्हणतात की ब्रम्हदेवाने मयुरेश्वराची दोनदा मूर्ती बनविली आहे. पहिली मूर्ती सिंदुरासुराने तोडली, म्हणून ब्रम्हदेवाने दुसरी मूर्ती घडविली. सध्याची मूर्ती खरीनसून मूर्तीच्या मागील मूर्ती खरी आहे. आकारात लहान आणि वाळू, लोखंड आणि हिरे यांच्या अंशांनी बनलेली आहे असे मानले जाते. नंदीची मूर्ती मयूरेश्वरच्या मंदिर असण्यामागचे कारण असे आहे की, नंदीची मूर्ती रथातून शंकराच्या मंदिरात घेऊन जात असताना, मयुरेश्वराच्या मंदिरासमोर रथ आल्यावर रथाचे चाक तुटले होते. म्हणून नाडीची मूर्ती या मंदिरात स्थापित केली.
जवळ आसपासची इतर दर्शनीय स्थळे
पांडवकालीन पांडेश्वर मंदिर अंतर १२ किमी आहे.
जेजुरीचे श्री मल्हारी मार्तंड खंडोबाचे मंदिर आणि लवथळेश्वर हे शिवमंदिर अंतर १७-१९ किमी आहे.
संत सोपान महाराज यांची समाधी सासवड अंतर ३४ किमी आहे.
नारायणपूर दत्ताचे मंदिर, शिवमंदिर, बालाजी मंदिर आणि पुरंदर किल्ला अंतर अंदाजे ४२ किमी आहे.
हे वाचा : श्री स्वामी समर्थ - अक्कलकोट
२ सिद्धिविनायक मंदिर-सिद्धटेक
![]() |
अष्टविनायक दर्शन यात्रेतील हा दुसरा गणपती श्री सिद्धिविनायक, सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर असून, अष्टविनायकांपैकी एक मंदिर आहे. श्री सिद्धिविनायक सिद्धटेकचा हा गणपती अष्टविनायकांपैकी एक उजव्या सोंडेचा एकमेव गणपती असून कार्य सिद्धीस नेणारा आहे. या गणपतीने श्री विष्णूदेवाला सिद्धी प्राप्त करून दिली होती. असे मानले जाते की, हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित आहे. तुम्ही जर या टेकडीला सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा घातल्या तर तुमच्या जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कामे पूर्णत्वास जातात यासाठी याची ख्याती आहे.
मंदिरातील गणपतीच्या मूर्तीची सोंड उजवीबाजूस वळलेली आहे. सामान्यतः गणपतीची सोंड ही त्याच्या डाव्याबाजूस वळविलेली असते. परंतु असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणपती हा खूपच शक्तिशाली असतो, परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच अवघड काम आहे. हे एकमेव अष्टविनायक मंदिर असे आहे की, जिथे गणपतीची सोंड उजवीकडे आहे. "सिद्धी-विनायक" म्हणजे उजवीकडे सोंड असलेला गणपती होय. जो गणपती सिद्धी ("सिद्धी, यश", "अलौकिक शक्ती") प्राप्त करून देणारा गणपती तो सिद्धी-विनायक गणपती. सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत देवस्थान मानले जाते . येथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते.
पुराणातील वर्णनानुसार सृष्टीच्या सुरुवातीस, जेव्हा विष्णूदेव हे त्यांच्या योगनिद्रेत असताना त्यांच्या नाभीतून एक कमळ उगवले. याच कमळातून सृष्टीचा निर्माता-देव ब्रह्मा उदयास आले. ब्रह्माने विश्वाच्या निर्मितीचे काम सुरू केले, निर्मितीचे काम सुरु असतानाच, मधु आणि कैतभ हे दोन राक्षस विष्णूच्या कानातून पैदा झाले. या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टिनिर्मितीच्या कामात अडथळा आणला आणि देवांना छळण्यास सुरुवात केली. ब्रम्हदेवाने साक्षात विष्णूला योगनिद्रेतून जागृत करण्यास भाग पाडले. या विनाशकारी राक्षसांसोबतं विष्णू नारायण लढाई लढले खरे. पण त्या दानवांचा पराजीत करू शकले नाहीत. विष्णूदेवाने शिवाची आराधना करून यामागील कारण शिवाला विचारले. शिवाने विष्णूला ओम श्री गणेशाय नमः चा मंत्र दिला. अखेरीस, विष्णूदेवाने सिद्धटेक येथे जाऊन गणपतीची तपश्चर्या केली. गणेशाने प्रसन्न होऊन, विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी ("शक्ती") प्राप्त करून दिल्या. नंतर विष्णूदेवाने त्या दोन राक्षसांना ठार केले. विष्णूदेवाने ज्या ठिकाणी तपश्चर्या करून सिद्धि प्राप्त केली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते.
या मंदीरातील सिद्धिविनायकाची मूर्ती ही स्वयंभू असून ३ फुट उंचीची आहे. या मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली असून उत्तराभिमुख आहे. अष्टविनायकांपैकी हा एकमेव गणपती असा आहे ज्याची सोंड उजव्या बाजूकडे वळलेली आहे. पितळेच्या चौकटीत बसवलेल्या या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणेशाच्या दोन्ही बाजूस जय-विजय यांच्या पितळेच्या धातूच्या मुर्त्या बसवलेल्या आहेत. गणपतीची मुद्रा अतिशय शांत दिसते. सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय लाभ दायक मानले जाते. एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३० मिनिटांचा वेळ आणि जवळजवळ ५ किमीचा प्रवास करावा लागतो. ही मूर्ती डोंगराला जोडलेली असल्यामुळे संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते.
जवळ आसपासची इतर दर्शनीय स्थळे
१) पेडगांव येथील भीमा नदीच्या काठावरील प्राचीन मंदिरे आणि किल्ला अंतर ९ किमी आहे.
२) राशीन- झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर अंतर २१ किमी आहे.
३) रेहेकुरी- अभयारण्य. अंतर ३१ किमी आहे.
४) भिगवण- पक्षी अभयारण्य. अंतर २७ किमी आहे.
५) दौंड- भैरवनाथ आणि श्री विठ्ठल मंदिर. अंतर २६ किमी आहे.
हे वाचा : आनंद सागर शेगाव
३ बल्लाळेश्वर मंदिर-पाली
![]() |
श्री बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायक दर्शन तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरओळखला जातो. हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा मोठा भक्त होता.
ही कथा कृतयुगातील आहे, पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती हिच्या बरोबर राहात होता. काही दिवसांनी त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे बल्लाळ असे नामकरण केले. पुत्र बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा तो गणेश भक्तीत गुंतू लागला. हळूहळू तो सतत गणेशभक्तीमध्ये रमू लागला आणि त्याने त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लावले. बल्लाळ त्याच्या मित्रांना रानात घेऊन जात असे आणि गणेशमूर्तीचे भजन-पूजन करीत असे. कल्याण शेटजींच्या पोरामुळे गावातील मुले बिघडली अशी ओरड गावात सुरु झाली. म्हणून गावातील लोकं कल्याण शेठ्जीकडे त्यांच्या मुलाबद्दल तक्रार करू लागले.
कल्याण शेटजीला आपला मुलगा लहान वयातच भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर गावातील इतर मुलांनाही नादाला लावले या विचाराने राग आला. रागाच्या भरातच शेटजीने एक मोठी काठी घेऊन बल्लाळ जिथे भक्ती करत होता तिथे गेला. तेथे बल्लाळ त्याच्या मित्रांना गणेश पुराण कथा सांगत होता. सारेजण गणेशाच्या भक्तीत तल्लीन होते. समोरील दृश्य पाहून कल्याण शेठजींचा राग अनावर झाला. शेटजी मोठ्याने ओरडत, शिव्या देतच पुढे धावले. त्याने मुलांनी मांडलेली गणेश पूजा मोडून टाकली. दगडाची गणेशाची मूर्ती फेकून दिली. बल्लाळचे मित्र भीतीने गांगरून पळून गेले; परंतु बल्लाळ मात्र गणेश भक्तीत मंत्रमुग्ध होता.
कल्याण शेठजीने बल्लाळास काठीने मारून फोडून काढले. त्या मारात बल्लाळ रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला; तरीसुद्धा कल्याणला त्याची दया आली नाही. त्याच अवस्थेत बल्लाळाला त्याने एका झाडाला बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, 'बघू आता तुझा गणेश आता तुला सोडवायला येतोय का ते. घरी आलास तर जीवे मारून टाकीन, माझा तुझा संबंध कायमचा तुटला.' असे बोलून कल्याण शेठ घरी निघून गेला.
थोड्या उशिराने बल्लाळ शुद्धीवर आला. त्याचे शरीर वेदनेने ठणकत होते. तशाच अवस्थेत त्याने गणेशाची याचना केली . ''हे देवा, तू विघ्णहर्ता आहेस. तू तुझ्या भक्ताला कधीही नाराज करीत नाहीस. ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले त्याचे जीवन दुःखी-कष्टी बनाव. नाहीतर आता तुझे चिंतन करीतच मी प्राणत्याग करीन.'
बल्लाळाची याचना ऐकून ब्राह्मण रुपात विनायक-गणेश प्रगट झाला. गणेशाने बल्लाळाला बंधनातून मुक्त केले, त्याचे रक्ताळलेले शरीर होते तसे परत झाले. तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी काय तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल, असे गणेश बल्लाळाला म्हणाला. बल्लाळाच्या भक्तीने प्रसन्न झालेला गणेश म्हणाला तुला हवा तो एक वर माग.
बल्लाळाने गणपतीला इथेच राहण्याची विनंती करून लोकांची दुःखे दूर करण्यास सांगितले. गणपती म्हणाला, “ मी माझा एक अंश इथेच ठेवतो, आणि लोकं माझ्या नावाच्याआधी तुझे नाव घेतील ". मला लोक बल्लाळ विनायक यानावाने हाक मारतील.” गणपतीने भक्त बल्लाळाला एक आलिंगन दिले आणि तो जवळच्या दगडात लुप्त झाला. त्या दगडाला पडलेल्या भेगा अदृश्य झाल्या आणि तो दगड पुन्हा अखंड झाला. त्याच दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो. कल्याण वाण्याने जो पुजलेला दगड फेकून दिला होता त्यालासुद्धा धुंडीविनायक असे म्हंटले जाते. हा गणपती एक स्वयंभू असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी केली जाते.
एका दगडी आसनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थापित केलेली आहे. हा गणपती पूर्वाभिमुख असून त्याची सोंड डाव्याबाजूला वळलेली आहे. मूर्तीच्या पार्श्व भाग चांदीचा असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येते. या बल्लाळेश्वराच्या मूर्तीच्या डोळ्यांत आणि बेबीत हिरे बसवलेले असून मूर्तीची उंची तीन फुट आहे.
ह्या मंदिराची रचना अशाप्रकारे केलेली आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी असून या दगडांना शिश्याच्या रसाने एकमेकांबरोबर जोडलेले आहे.
सगळीकडे गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराला इथे बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो.
येथे मागील बाजूस असलेल्या डोंगराच्या आकारासारखीच या गणपतीची मूर्ती आपणाला दिसते. आपण जेव्हा या डोंगराला पाहतो आणि नंतर गणपतीच्या मूर्तीला पाहतो तेंव्हा हे साम्य विशेष करून जाणवते.
जवळ आसपासची इतर दर्शनीय स्थळे
१) मंदिराच्या जवळच सरसगड नावाचा किल्ला अंतर २.३ किमी आहे.
२) सुधागड या किल्ल्यात भृगु ऋषींनी स्थापन केलेले भोराईदेवीचे मंदिर अंतर ११ किमी आहे
३) सिद्धेश्वर येथील शंकराचे स्वयंभू मंदिर अंतर ३ किमी आहे.
४) उध्दर हे स्थान जिथे रामाने जटायूचा उद्धार केला अंतर ४ किमी आहे.
५) उन्हेरे हे स्थान जिथे गरम पाण्याचे झरे अंतर ३ किमी आहे.
६) पुई एकवीस गणेश मंदिरे अंतर २३ किमी आहे.
७) ठाणाळे कोरीव लेणी अंतर १३ किमी आहे.
हे वाचा : पंढरपूर दर्शन
४ वरद विनायक मंदिर-महाड
![]() |
हा गणपती रायगड जिल्ह्यात असून अष्टविनायक दर्शनातील चौथा गणपती म्हणून महाडच्या श्री वरदविनायक गणपतीची ओळख आहे. येथील गणपतीच्या एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.
हे मंदिर अष्टविनायकांपैकीएक आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार केला असला तरी मंदिराचा गाभारा मात्र पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी रचनेचा आहे. हा गणपती पुरातन कालीन आहे. गणपती येथे वरदविनायक या रूपात भक्तांच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद देतो. श्री धोंडू पौढकर यांना १६९० मध्ये मूर्ती तलावात सापडली होती. कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी १७२५ मध्ये हे मंदिर बांधले आणि महाड गावही वसवले.
या मंदिराच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या मंदिराला २५ फूट उंचीचा कळस आहे. तसेच कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा असून पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत तेवत ठेवलेला नंदादीप दिसतो, असे म्हणतात की हा नंदादीप १८९२ पासून तेवत ठेवलेला आहे.
भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला, त्याला आपत्य होत नसल्याने तो दुःखी होता. एकदा तो आपल्या राणीसह वनात गेला. विश्वामित्र ऋषींनी त्याचे दुःख जाणले आणि त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने खूप कडक तपश्चर्या करून विनायकाला प्रसन्न करून घेतले. राजाला पुत्रप्राप्तीचा वर मिळाला.
काही दिवसांनी राजाला एक पुत्ररत्न प्राप्त झाले, त्याचे रुक्मांगद हे नाव ठेवले. राजकुमार रुक्मांगद वयात आल्यावर राजाने त्याच्या राज्याचा सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपवून त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.
रुक्मांगद शिकारीसाठी अरण्यात भटकत असताना वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहचला. ऋषीच्या पत्नी मुकुंदा रुक्मांगदाला पाणी देताना त्याच्या प्रेमात पडली, परंतु रुक्मांगदाने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. मुकुंदेचा राग अनावर झाला आणि तिने रुक्मांगदाला कुष्ठरोगी होशील असा शाप दिला.
शाप मिळाल्यामुळे रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. दुःखी झालेला रुक्मांगद रानावनांत भटकत असताना त्याची आणि नारदमुनींची भेट घडून आली. नारदाने त्याला चिंतामणी गणेशाची प्रार्थना करण्याचा आदेश दिला. नारद मुनींच्या आज्ञेनुसार रुक्मांगदाने कदंब तीर्थात स्नान करून चिंतामणी गणेशाची प्रार्थना केली, व शापमुक्त होऊन रुक्मांगद रोगमुक्त झाला.
मुकुंदेची हि अशी अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप धारण करून तिची इच्छा पूर्ण केली. इंद्रापासून मुकुंदेला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव गृत्समद. गृत्समदाला स्वतःच्या जन्माची कथा माहित झाली , तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेऊन तिला शाप दिला. मग त्याने पुष्पक (भद्रक) वनात तप करून विनायकाची आराधना करण्यास सुरु केले. विनायकाला प्रसन्न करून घेतले व विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने विनायकाला, याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली. विनायकाने त्याची ही ईच्छा मान्य करून वनात राहू लागला. तेच हे पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड होय. याच स्थळी गृत्समदाला विनायकडून वर मिळाला होता म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' असे म्हणतात. गाणपत्य संप्रदायाचा मोठा आद्य प्रवर्तक म्हणून गृत्समदला ओळखले जाते. पुरातन काळात महाडचे नांव मणिपूर वा मणिभद्र असे होते
१६९० मध्ये श्री धोंडू पौडकर यांना मूर्ती तळ्यात सापडली होती. ही मूर्ती मंदिरात गाभाऱ्याच्या बाहेर आहे. मूर्तीची अवस्था एकदम वाईट झाली होती, म्हणूनच मंदिराच्या विश्वस्तांनी त्या मूर्तीचे विसर्जन केले आणि त्याजागी नवीन मूर्ती स्थापित केली. अनेक भक्त लोकांनी या विश्वस्तांच्या कृतीवर हरकत घेऊन कोर्टात दावा दाखल केला. म्हणून आता आपल्याला या मंदिरात दोन मुर्त्या आढळून येतात, एक मूर्ती गाभाऱ्यात आणि दुसरी बाहेर दिसते. एक मूर्ती शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डाव्याबाजूस वळलेली आहे आणि दुसऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाची मूर्ती असून तिची सोंड उजव्याबाजूस वळलेली आहे. गाभाऱ्यात प्रवेश करताच सर्वात अगोदर रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या दिसतात आणि नंतर गणपतीच्या त्या दोन मुर्त्या दिसतात. या मुर्त्यांची पूर्वाभिमुख स्थापना केलेली आहे.
जवळ आसपासची इतर दर्शनीय स्थळे
१) खोपोली येथील योगीराज गगनगिरी महाराजांचा आश्रम अंतर १११ किमी आहे.
२) थंड हवेची ठिकाणे लोणावळा खंडाळा अंतर १२६ किमी आहे.
३) कार्ले येथील लेणी व एकवीरा मातेचे मंदिर अंतर १०९ किमी आहे.
४) देहू येथील संत तुकाराम महाराज समाधी अंतर अंदाजे १४७ किमी आहे.
हे वाचा : समर्थांनी स्थापन केलेले ११ मारुती
५ चिंतामणी मंदिर-थेऊर
![]() |
हे अष्टविनायक मंदिर पुण्याहून २२ किमी अंतरावर स्थित आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खंडाळ्याच्या थोडे अलीकडेच आहे. थेऊर हे गाव महामार्गापासून थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.
आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने अतिशय घोर तपश्या केली आणि गणासूर याला जन्म दिला. गणासूराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेंव्हा ऋषींनी त्यांच्या जवळी असलेल्या चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासूराला उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घातले होते. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा मोठा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न बळजबरीने घेतले. त्यावर त्यांनी दुर्गा देवीला सर्व हकीकत सांगितली आणि दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची प्रार्थना करून गणेशाची मदत घेण्याचा सल्ला दिला.
गणपतीने गणासुराला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिले. कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या कंठात घातले आणि तेंव्हापासून कंठात चिंतामणी रत्न घातलेला गणपती "चिंतामणी विनायक" म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला 'कदंबपूर' असेसुद्धा म्हणतात.
चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख असून गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने बसविलेली आहेत. या मंदिराचे महाद्वार किंवा मुख्य प्रवेशद्वार हे उत्तरेकडील बाजूस असून मुळा-मुठा नदीच्या रस्त्याला जोडते. मंदिराच्या आवारात एक छोटे शिवमंदिर आहे.
चिंतामणी गणपती पेशवे घराण्याचा कुलदैवत आहे. श्री माधवराव पेशवे हे याच मंदिरात शेवटच्या दिवसात वास्तव्यास होते आणि त्यांनी त्यांचे प्राण याच मंदिरात गणपतीचे नाव घेत सोडले. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी कठोर तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न केले. त्यावर प्रसन्न होऊन गणपतीने नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपात अवतीर्ण होऊन त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.
जवळ आसपासची इतर दर्शनीय स्थळे
१) थेऊरच्या डोंगररांगामध्ये भुलेश्वराचे प्राचीन आणि प्रेक्षणीय शिवमंदिर अंतर ४० किमी आहे.
२) श्री नारायण महाराज यांचा आश्रम व दत्तमंदिर केडगांव अंतर ४३ किमी आहे.
३) रामदरा येथील पाण्याने वेढलेले शिवमंदिर अंतर ४ ते ५ किमी आहे.
४) उरळीकांचन येथे महात्मा गांधी स्थापित निसर्गोपचार आश्रम अंतर १३ किमी आहे.
५) वाघोली-केसनंद या रस्ते मार्गावर वाडेबोल्हाई मंदिर अंतर १३ किमी आहे.
६) तुळापुर येथील भीमानदी तिरी संगमेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचे स्मारक अंतर
२१ किमी आहे.
हे वाचा : सदगुरु श्री संत बाळूमामा समाधि मंदिर
६ गिरीजत्माज मंदिर- लेण्याद्री
![]() |
लेण्याद्रीच्या पर्वतावर श्री गिरीजत्माजचे मंदिर असून तिथे पोहचण्यास अडीच तासांचा प्रवास नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे गेल्यास लागतो. गिरीजत्माज म्हणजे पार्वती म्हणजे गिरीजा हिचा पुत्र असून अष्टविनायकांपैकी हे एकच असे मंदिर आहे जे पर्वतावर आणि १८ गुहा असलेल्या एका बौद्ध लेण्यांच्या संकुलात अस्तित्वात आहे. १८ गुहैपैकी ८ व्या गुहेत हे गणेश मंदिर दिसून येते. गणेश मंदिर गुहेत असल्यामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा म्हंटले जाते.
गणेश पुराणात असे वर्णन आहे की, देवी सतीला आपल्या पोटी गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्ती केली. पार्वतीच्या रूपात गणेशाला जन्म देण्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर घोर तपश्चर्या केलली. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगावरच्या मळापासून एक मूर्ती बनविली. गणेशाने या मूर्तीत प्रवेश केल्याबरोबरच सहा हात आणि तीन डोळ्यांचे बालक निर्माण झाले. गणपतीने गिरीजत्माज अवतारात लेण्याद्री पर्वतावर १५ वर्षे वास्तव्य करून अनेक दैत्यांचा संहार केला होता असे म्हंटले जाते.
या मंदिराला ३०७ पायऱ्या असून मंदिर दक्षिणाभिमुख आहे आणि मंदिरातील गणेशाची मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. आपण मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम पाठमोऱ्या गणपतीचे दर्शन घडते येथे अशा पाठमोऱ्या गणपतीच्या मूर्तीचीच पूजा केली जाते. मंदिराची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की आकाशात सूर्य असेपर्यंत मंदिरात उजेड पडलेला असतो आणि त्यामुळेच या मंदिरात एकही विद्युत बल्ब दिसत नाही. या मूर्तीची सोंड डाव्याबाजूला वळलेली आहे. मूर्तीच्या डावीकडील बाजूस आणि उजवीकडील बाजूस मारुती आणि शंकर आहेत. या गणपतीच्या मूर्तीची बेंबी आणि कपाळ हिरेजडित दिसतात. ह्या मंदिराचे अस्तित्व पूर्णपणे दगडाला कोरून बनविलया गुहेत असल्यामुळे इथे प्रदक्षिणा घालता येत नाही. इथे मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आढळून येतात.
असेसुद्धा मानले जाते की या गुहा पांडवकालीन असून पांडवांनी या गुहा वनवास असताना बनविल्या. इथे गुहेत न त्याला सभा मंडप आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यानस्त होऊ शकतात.
जवळ आसपासची इतर दर्शनीय स्थळे
१) शिवनेरी किल्ला अंतर ६.२ किमी आहे.
२) ओतूर येथील कपर्दिकेश्वर मंदिर आणि चैतन्यस्वामी यांची समाधी अंतर १७ किमी आहे.
३) उगमाजवळील कुकडेश्वर मंदिर अंतर ८.६ किमी आहे.
४) माळशेज घाटातील अभयारण्य अंतर २८ किमी आहे.
५) ऐतिहासिक नाणेघाट अंतर ३३ किमी आहे.
७ विघ्नेश्वर मंदिर- ओझर
![]() |
मंदिर लेण्याद्रीपासून २० किमी असून साधारणपणे ४५ मिनिटांचे अंतरावर आहे. याठिकाणी गणेशाने विघ्नासुर राक्षसाला ठार केले होते म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा ईश्वर किंवा देव असासुद्धा होतो.
पुराण कथेनुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळविण्यासाठी यज्ञ केला. संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तिथे विध्वंस करून यज्ञ बंद पडण्यासाठी पाठविले. विघ्नासुराने यज्ञा बाधा तर केलीच शिवाय त्याने पृथ्वीवर अनेक विघ्ने निर्माण केली. म्हणून या भूतळावरील लोक ब्रम्हदेव आणि शंकर यांच्याकडे याचना करण्यासाठी गेले. त्या दोघांनी लोकांना गणपतीची आराधना करून मदतीची याचना करण्यास सांगितले.
समस्त लोकांनी गणपतीची प्रार्थना करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. नंतर गणपतीने पराशर ऋषींच्या पुत्राच्या रूपात अवतारीत होऊन विघ्नासुराबरोबर घनघोर युद्ध केले आणि गणपतीने त्याचे अस्तित्व संपुष्टात आणले. यामुळे लोक अतिशय हर्षित झाले आणि त्यांनी इथेच विघ्नेश्वराची स्थापना केली.
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर ४ द्वारपाल उभे असल्याचे दिसते. १ल्या आणि ४ थ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग असल्याचे दिसते. गणशा त्यांच्या मातेचा आणि पित्याचा अतिशय आदर करतो. येथील द्वारपालांच्या हातातील असलेले शिवलिंग हेच दर्शवितात की गणेशाच्या भक्तांनीसुद्धा त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे.
मंदिरच्या भिंतींवर डोळ्यांना प्रसन्न वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे पाहायला. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवताली भक्कम तटबंदीसाठी दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी असून मंदिराची लांबी २० फुटाची आणि मंदिराचा मुख्य सभामंडप १० फुट लांबीचा आहे. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डाव्याबाजूस आहे आणि त्याचे डोळे माणिक रत्नाचे आहेत. गणपतीच्या आजूबाजूला रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या आहेत. शेषनाग आणि वास्तुपुरुष मुर्तीच्यावर दिसतात. मंदिरात लहान लहान खोल्या दिसतात त्यांना ओवऱ्या म्हंटले जाते. यांच्यात बसून भक्तगण ध्यान करू शकतात.
जवळ आसपासची इतर दर्शनीय स्थळे
१) भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग अंतर ७८ किमी आहे.
२) आर्वी उपग्रह केंद्र अंतर १३ किमी आहे.
३) खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी आकाश दुर्बीण अंतर २१ किमी आहे.
४) रेड्याची समाधी आळे अंतर २७ किमी आहे.
८ महागणपती मंदिर- रांजणगाव
![]() |
ओझरपासून २ तासाच्या अंतरांवर हे मंदिर स्थित आहे. अष्टविनायक दर्शन यात्रेतील आठवे मंदिर हे महागणपतीचे आहे आणि ते सर्वात शक्तिशाली असल्याचे मानले जाते. शंकराने त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी इथे त्यांनी गणेशाची प्रार्थना केली होती.
गणेशपुराणानुसार ऋषी ग्रीत्समद यांचा मुलगा त्रिपुरासुर एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा मोठा भक्त होता. त्याच्या भक्तीने गणेश प्रसन्न झाले आणि त्याला त्रिपुराइतका मौल्यवान धातू आशिर्वाद म्हणून दिला. गर्वाने मदमस्त झालेल्या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. ब्रम्हदेव आणि विष्णू त्याच्या त्रासाला कंटाळून लपून बसले. तेंव्हा भयभीत होऊन दबा धरून बसलेल्या देवांना नारदाने गणपतीची मदत घ्यावी असा सल्ला दिला. गणपतीने देवांची मदत करण्याचे मान्य केले.
ब्राम्हण वेशातील गणपतीने त्रिपुरासुराला तीन उडणारी विमाने बनवून देण्याची कारण देत त्याला कैलास पर्वतावरून चिंतामणीची मूर्ती आणावयास सांगितले. लोभाने आंधळा झालेल्या त्रिपुरासुराने कोणताही विचार न करता कैलास पर्वतावर आक्रमण केले. महादेव त्याला हरवू शकले नाहीत. महादेवांच्या लक्षात आले की त्यांनी गणपतीची वंदना केली नाही. महादेवाने षडाक्षर मंत्र म्हणत गणेशाला आवाहन केले आणि तेथे गणपती प्रकट झाला तेंव्हा त्याने महादेवाला त्रिपुरासुराला हरविण्याच्या सूचना सांगितल्या. त्या सूचनांचे पालन करून महादेवाने लोभी त्रिपुरासुराला ठार केले आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले.
हे पूर्वाभिमुख मंदिराची रचना अशा प्रकारे केलेली आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे सरळ गणपतीच्या मूर्तीवर पडतात. कमळावर बसलेल्या गणपती सोबत रिद्धी-सिद्धी दिसत आहेत. ह्या स्वयंभू गणपतीच्या मूर्तीच्या खाली अजून एक १० सोंडी आणि २० हात असलेली मूर्ती आहे, तिला 'महोत्कट' असे म्हणतात. परंतु या मूर्ती अस्तित्वाची खात्री कोणीच देत नाही.
हा महागणपती अतिशय शक्तिशाली असल्यामुळे गणेशउत्सवात रांजणगांवचे गावकरी त्यांच्या घरी गणपती बसवीत नाहीत. उलट ते सर्व गावकरी या देवळात जाऊन पूजा आणि अर्चा करतात.
कमळावर मांडी घालून आसनस्थ असलेल्या गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख असून रुंद कपाळ, डाव्या सोंडेचा आणि स्वयंभू आहे.
जवळ आसपासची इतर दर्शनीय स्थळे
१) वडू बुद्रुक येथील संभाजी महाराजांची समाधी अंतर २७ किमी आहे.
२) निघोज, कुकडी नदीतील खडकांमधील रांजण आकाराचे नैसर्गिक खळगे अंतर २७ किमी आहे.
हे वाचा : पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे
अष्टविनायक यात्रा - Ashtavinayak Yatra
अष्टविनायक दर्शन यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या विशेष गाड्या पुणे आणि सर्व ठिकाणाहून जातात. खासगी प्रवासी कंपन्यासुद्धा अष्टविनायक दर्शन सहलीचे आयोजन करतात. आपण आपल्या स्वतःच्या मालकीच्या वाहनानेसुद्धा ही यात्रा करू शकता. भक्तांच्या निवासासाठी सोयी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याची रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. अष्टविनायक दर्शनाची मंदिरे २० ते ११० किमी इतक्या अंतराच्या प्रवासाच्या दरम्यानच आहेत.
ही आठही अष्टविनायक मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी स्थापलेली आहेत आणि या मंदिरांना भेट देण्याचा एक ठराविक शाश्त्रिय क्रम आहे. परंपरेनुसार अष्टविनायक गणपती दर्शन यात्रा मोरगांवच्या मोरेश्वराच्या दर्शनाने सुरु करतात आणि त्यानंतर सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगांव याक्रमाने मंदिरांना भेट देण्यात येते. पहिल्या मोरगांवच्या गणपतीचे दर्शन घेऊनच या तीर्थयात्रेची सांगता होते.
अस्वीकरण
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. अशा सर्व प्रतिमा त्यांच्या संबंधित मालकांचे कॉपीराइट आहेत आणि आम्ही जिथे जमेल तिथे त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्न करतो. तथापि, जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
Post a Comment