सदगुरु श्री संत बाळूमामा समाधि मंदिर
बाळूमामा हे भारतीय धनगर समाजातील एक गूढवादी, संत योगी होते आणि लोक त्यांना शिवाचा अवतार मानत होते. बाळूमामांनी स्वतःच्या कुटुंबात खेळण्याऐवजी गरिबांची सेवा करण्यावर अधिक भर दिला. त्यांनी आपल्या साध्या शिकवणीतून लोकांच्या अनेक समस्या आणि अडचणी सोडवल्या. त्याच्याकडे सर्व जाती-वर्गाचे लोक अडचणी घेऊन येत होते. बाळूमामाचा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता. बाळूमामा नेहमी शाकाहारी भोजन करायचे. गारगोटीचे "मुळे महाराज" हे त्यांचे गुरू होते. "ज्ञान हे जीवन आहे आणि अज्ञान हे मरण आहे" असे ते लोकांना ठामपणे सांगायचे. तो मेंढपाळ कुटुंबात जन्मला असला तरी त्याने सर्वांसाठी काम केले.
बाळूमामा तापट स्वभावाचे होते, अगदी साधे जीवन जगत होते, त्यांच्या पेहरावात डोक्यावर रेशमी किनार असलेला फेटा, शर्ट, धोती यांचा समावेश होता. ते नेहमी स्वच्छ कपडे वापरत होते. संपूर्ण जग त्यांचे कुटुंब होते म्हणून त्यांना जगतगुरु म्हणतात. आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, आनंद, भीती, समाधान आणि शांती बाळूमामाच्या चरणी आहेत.
सदगुरु श्री संत बाळूमामा समाधि मंदिर | Sadguru Shri Sant Balumama Samadhi Temple
बाळूमामांचे जीवन
बाळूमामांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या गावी १८९२ मध्ये झाला होता. आईचे नाव सुंदरा व वडिलांचे नाव मयाप्पा असे होते. आईचा त्यांच्यावर फार जीव होता. लहानपणी ते खूप हट्टी स्वभावाचे होते. वडील मयप्पाला त्यांची सतत चिंता वाटत राहायची. त्यांच्या वडीलांना आपल्या मुलाने सुधरावे, काहीतरी कामधंदा करावा, यासाठी मयप्पाने बाळूमामांना चंदुशेटजीकडे कामासाठी पाठवले. बाळूमामा तेथे शेतात व गोठ्यात काम करत होते. तेथे त्यांचे राहण्याची व खाण्याची व्यवस्था होती. एके दिवशी, मध्यरात्री गोठ्यात असलेल्या गायी मोठ्याने ओरडू लागल्या, म्हणून चंदुशेटजीची आई गोठ्यात काय झाले ते पाहण्यासाठी तेथे गेली. त्यावेळी तिला फुटक्या ताटामधून लख्ख प्रकाश येताना दिसला आणि त्या प्रकाशात तिला बस्तीचे (महावीर) दर्शन झाले.
शेटजीच्या आईला ज्या ताटात "बस्तीचे" दर्शन झाले होते, त्या ताटात बाळूमामा रोज जेवन करत होते. तीने मोठ्या आदराने, ते ताट स्वतःच्या देवघरात आणून पूजेसाठी ठेवले. दुसर्या दिवशी बाळूमामांना त्यांचे ताट खिडकीत दिसले नाही म्हणून त्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. परंतु काही केल्या ताट सापडेना, म्हणुन ते शेटजींच्या घरी गेले आणि ताटाबद्दल विचारणा केली. शेटजीला यातले काहीच माहिती नव्हते. शेटजीच्या आईने ताट घेतल्याची कबुली दिली खरी परंतु ते ताट परत देण्यास नकार दिला.
ती म्हणाली, मला या ताटात "बस्तीचे" दर्शन झालेले आहे, म्हणून हे ताट मी माझ्या देवघरात पूजेसाठी ठेवलेले आहे. म्हणून मी तुला हे ताट देणार नाही, हवे तर मी तुला दुसरे नवीन चांदीचे ताट देते. यावर बाळूमामा म्हणाले मला दुसरे नवीन ताट नको, माझे फुटके ताटच मला परत द्या अन्यथा मी दुसऱ्या ताटात जेवणार नाही. बाळूमामांना त्यांचे फुटके ताट परत मिळाले नसल्यामुळे त्यांनी जेवण केले नाही. बाळूमामा जवळजवळ चार दिवस उपाशी राहून चंदुशेटजीकडे काम करत राहिले. त्यानंतर, ते चंदुशेटजींचे काम सोडून निघून गेले. जाताना बाळूमामांनी शेटजींच्या घराला शाप दिला.
परंतु शेटजींनी माफी मागितल्यानंतर त्यांनी त्या घराला उपशाप पण देऊन टाकला. बाळूमामाच्या शापामुळे काही दिवसांनंतर, चंदुशेटजींचे वैभवाचे दिवस निघून गेले. बाळूमामाच्या उपशापामुळे शेटजींना १२ वर्षानंतर परत वैभवाचे दिवस आले.
गावातील लोक बाळूमामांना खुळा (वेडा) म्हणत
बाळूमामा लहानपणी जे काय बोलायचे आणि करायाचे ते सर्व सामान्य माणसांच्या समजण्यापलिकडचेच असायचे, म्हणून लोक त्यांना खुळा (वेडा) म्हणत. ते कधी कधी उंच झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचे किंवा काट्याच्या पांजरीवर ध्यान करायला बसायचे. मामांच्या कार्याची जाणीव असलेले लोक बाळूमामाच्या पायाजवळ डोके ठेवत असत. आणि इतर लोक त्यांना वेड्यात काढत असत. वडील मयाप्पा देखील बाळूमामाना वेडेच समजत असत, त्यांना बाळूमामाच्या वागण्याचा राग येत असत, कारण बाळूमामाचे वागणे हे इतर सामान्य मुलांसारखे वाटत नव्हते. बाळूमामांचा त्यांच्या आईवर खूप जीव होता. त्यांची आई नेहमी त्यांची बाजू घेऊन बोलायची, फक्त आईच त्यांना समजून घेत होती. त्यांना दोन भाऊ आणि एक बहीण होती.
हे वाचा : श्री स्वामी समर्थ महाराज- अक्कलकोट
बाळूमामांचे लग्न
बाळूमामाना संसारामध्ये अजिबात रस नव्हता. लोकांचे प्रश्न सोडवणे, त्यांना अध्यात्माचा मार्ग दाखवणे अशी कामे करायला आवडत असे. त्यांचे वडील मयप्पा बाळूमामांची सतत काळजी करीत असत. त्यांचा मुलगा इतरांच्या मुलांप्रमाणे वागावा अशी त्यांची इच्छा होती. पण बाळूमामा स्वताच्या इच्छेप्रमाणे वागायचे आणि करायचे. त्यांच्या घरचे असे विचार करत होते की, जर बाळूचे लग्न लावले तर बाळू आपोआपच सुधारेल. म्हणून त्यांचे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध बहिणीच्या मुलीशी लावून दिले. नंतर, बाळूमामा त्यांच्या बहिणीबरोबर राहू लागले. सासुरवाडीच्या १५ मेंढ्यांचा सांभाळ करत करत त्यांनी स्वतःची मेंढरे वाढविली.
बाळूमामांचे चमत्कार
आपल्या कळपाचा सांभाळ करत त्यांनी अनेक चमत्कार केले. गोरगरीब व अडचणीत असलेल्या लोकांना मदत केली आणि माजोरी श्रीमंत सावकार यांचा माज उतरवला. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात मेंढरं चारण्यासाठी ते लांब पल्ल्याचा प्रवास करीत असत. त्यांचे कन्नड आणि मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांच्या तोंडातून निघालेले शब्द कधीही खोटे ठरत नसत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये त्यांचे भक्त मोठ्या संख्येने आहेत. त्यांनी संत म्हणून बाळूमामांची उपासना करण्यास सुरवात केली. बाळूमामाच्या मेंढयांना पवित्र मानले जाते. लोक म्हणतात की बाळूमामाच्या कळपातील मेंढा सुद्धा दूध देतो. बाळूमामांची मेंढरं ज्या शेतात चरतात किंवा बसतात, त्या शेतात चांगले पीक येते.
बाळूमामांचा तळ
बाळूमामा सतत एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी मेंढ्या चारण्यासाठी फिरत होते. त्यांचा आणि त्यांच्या मेंढयांचा मुक्काम गावाबाहेर रानावनात पडत होता. त्या ठिकाणाला बाळूमामांचा तळ असे म्हणायचे. बाहेरगावी असताना असे रानांत राहणे साहजिक होते, परंतु स्वतःच्या अक्कोळ गावी असतानासुद्धा ते घरात कमी आणि तळावरच जास्त वेळ थांबत होते. लोकांच्या तक्रारी व अडचणी बाळूमामा तळावरच सोडवत होते. तळावर येणाऱ्या लोकांना प्रसाद म्हणून कण्या आणि आंबिल दिला जात होता. कण्या आणि आंबीलचा प्रसाद खाल्ल्यावर लोकांना समाधान वाटत होते.
बाळूमामा घरचे काम कमी आणि बाहेरचे काम जास्त करायचे, म्हणजे लोकांची गाऱ्हाणी ऐकणे, त्यांच्या अडचणी सोडवीणे इत्यादी. बाळूमामाच्या घरच्यांना अशी लोकांची सेवा केलेली आवडत नव्हते, म्हणून त्यांच्या घरात त्यांच्या या गोष्टीवरून नेहमीच वाद होत होता. जरी घरात अशी परिस्थिती निर्माण होतहोती तर त्यांनी त्यांचे लोकांच्या सेवेचे कार्य सुरूच ठेवले होते. ते नेहमी म्हणायचे हे सारं जग माझे कुटुंब आहे.
हे वाचा : आनंद सागर शेगाव
बाळूमामा समाधी मंदिर प्रवेश
निपाणी-राधानगरी बस मार्ग किंवा कागल निढोरी बस मार्गाने आपण आदमापूरला पोहोचू शकता. कोल्हापूर ते आदमापूर बस मार्ग साधारण ४२ की मी चे अंतर आहे. १९६६ मध्ये वयाच्या ७४ व्या वर्षी बाळूमामांचे आदमापूर येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतीत आदमापूर येथे समाधी मंदिर बांधले गेले. या मंदिराची देखभाल "श्री बाळूमामा संस्थान" करीत आहे. बाळूमामाच्या मेंढरांची संख्या आता चाळीस हजारांवर पोहोचलेली आहे, त्यांचा सांभाळ त्यांचे भक्त करतात.
बाळूमामा समाधी मंदिराचे संपूर्ण बांधकाम संगमरवरी दगडात केलेले आहे. जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला एक भव्य प्रशस्त प्रार्थना हॉल दिसतो. ते प्रार्थना हॉल इतका भव्य आहे, की त्यात शेकडो लोकांना सामावून घेईल. सभागृहाच्या भिंतीवर आपल्याला बरेच मराठी श्लोक दिसतील, ज्याद्वारे संतांचे जीवन आणि त्यांचे तत्वज्ञान याची ओळख करून दिली जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी आपल्याला बाळूमामांची एक अतिशय आकर्षक मूर्ती दिसते. त्यांच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूला त्यांच्या गुरु "मुळे महाराज" यांची प्रतिमा आहे, त्यांच्या डाव्या बाजूला विठ्ठल आणि रुक्मिणीची प्रतिमा आहे आणि जवळच हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे. बाळूमामांची अत्यंत आकर्षक मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते.
मंदिरात बाळूमामांची समाधी आहे आणि ती संतांच्या नश्वर अवस्थांवर बांधली गेलेली आहे. वरच्या बाजूस दगडात कोरलेल्या पादुका आहेत, आणि जवळच पूजेसाठी खडवा ठेवलेल्या दसतील. मंदिरातील गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. आपल्याला काही अंतरावर उभे राहूनच दर्शन घ्यावे लागते. बाळूमामाच्या मूर्तीचे व बाहेर ठेवलेल्या पादुकावर डोके ठेवून दर्शन व आशीर्वाद घेऊन झाल्यावरती तिथे बसलेला भक्त आपल्या कपाळावर भंडारा लावतो, साखर, खडीसाखर आणि पेढा यांचे मिश्रण असलेला प्रसाद देतो. मंदिरात धातूपासून बनवलेला मेंढ्याचा पुतळा आहे. जर तुम्हांला काही समस्या किंवा अडचणी असतील तर त्या तुम्ही मेंढ्याच्या कानात सांगू शकता. काहीही अपेक्षित नाही आणि कोणत्याही भक्ताकडून काहीही स्वीकारले जात नाही.
तथापि, ज्यांना त्यांच्या इच्छेनुसार काही पैसे द्यावेसे वाटत असेल, त्यांच्यासाठी दोन गोल पत्राच्या दानपेट्या ठेवलेल्या आहेत. एक दानपेटी प्रसादाच्या खर्चासाठी आहे तर दुसरी वैद्यकीय सेवांसाठी आहे. भक्त वरीलपैकी एका किंवा दोन्ही दानपेटीत दान देऊ शकतात.
भाविकांनी अर्पण केलेला नारळ त्यांना 'प्रसाद' म्हणून परत दिला जातो, मंदिराच्या बाहेरील बाजूस नारळाची वाढविण्याची (फोडण्याची) व्यवस्था केलेली आहे. त्याठिकाणी काही भक्त नारळ वाढविण्याच्या सेवेसाठी बसलेले असतात, अर्धा नारळ आणि नारळाचे पाणी ते आपल्याला प्रसाद म्हणून परत देतात. जर तुम्हाला तिथे एक वेळच्या प्रसादासाठी आर्थिक दान करायचे असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्या नावाने प्रसादाची सोय केली जाते.
मंदिराच्या दक्षिणेस उंबराच्या झाडाखाली दत्तात्रेयांची मूर्ती आहे. भक्तांना आंबील पिण्यासाठी भरपूर स्टीलचे ग्लास ठेवलेले आहेत. आंबील पिल्यानंतर भाविकांना स्वत:चा ग्लास स्वतःच धुवून ठेवावा लागतो. मंदिराच्या उत्तरेस एक मोठे प्रसाद भवन आहे. पाच रुपयात आपल्याला प्रसादासाठी एक कूपन मिळेते. भाविकांना पोटभरून प्रसाद खायला मिळतो. जेवणानंतर, स्वत:चे ताट स्वतःच स्वछ धुवून ठेवायचे असते. प्रसाद भवनातील कपाटांत बाळूमामांनी वापरलेली भांडी आणि कपडे तुम्हाला पाहायला मिळतील. मंदिरासमोर हत्तीचे दोन मोठे पुतळे उभे केलेले आहेत. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीणच भर पडते. दर रविवारी व अमावश्येला आदमापूर येथे बाळूमामा समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी जमते. या दिवशी भाविकांना आंबील पिण्यास मिळते.
हे वाचा : केदारनाथ मंदिर - एक न उमगलेल कोडं
बाळूमामा भंडारा उत्सव
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूरात जगतगुरु बाळूमामांचा दर वार्षिक भंडारा उत्साह साजरा केला जातो. सात दिवस चालणारा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांच्या भक्तिमय वातावरणात, भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत, ढोल-ताशांच्या गगनभेदी आवाजात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ च्या जयघोषात संपुर्ण श्रीक्षेत्र आदमापूर भक्तिरसात न्हाऊन निघतो. उत्सवात जवळजवळ तीन लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
वेगवेगळ्या भागातील कीर्तनकार, प्रवचनकार यांची कीर्तने, प्रवचने, भजनी मंडळांची भजने, धनगरी ढोल यांच्या निनादात आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात भंडारा उत्सव पार पाडतो. जागरादिवशी रात्री उशिरा भाविक ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी करतात . पहाटे भाकणुकीचा कार्यक्रम होतो. धनगरी ओव्यांच्या गायनाने भाविक तल्लीन होतात. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भात व खिरीच्या महाप्रसादाचा लाभ लाखो भाविक घेतात.
तिसऱ्या दिवशी पालखी सोहळा बाळूमामाच्या मंदिरापासून आदमापुरातून सकाळी आठ वाजता सुरू होतो. धनगरी ढोलाच्या गगनभेदी आवाजाबरोबरच भजनी मंडळे, लेझीम पथके, दांडपट्टा, मानाच्या अश्वांचे नृत्य असा लवाजमा मिरवणुकीत सामील असतो. सायंकाळी गावच्या आड असलेल्या विहिरीवर भंडारा उधळून पालखी मंदिरात येते आणि मिरवणुकीची सांगता होते.
दुसऱ्या दिवशी गुढी पाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याला मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करतात, त्याला नशीबाचे नाव असे म्हणतात.
भक्त निवास
भाविकांसाठी दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. भाविकांच्या निवासाची सोय अगदी कमी खर्चात परिपूर्ण करण्यास भक्त निवास सज्ज आहे. इमारतीच्या आवारात पार्किंगची मोठी सुविधा उपलब्ध आहे. इमारतीच्या समोर एक बाग आहे. भक्त निवासस्थानासमोर बाळूमामांची एक मूर्ती आहे. अमावस्या आणि रविवारी भाविकांची मोठी गर्दी गर्दी असते. या दोन दिवसांव्यतिरिक्त, भक्त निवासात खोली मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही.
हे वाचा :पंढरपूर दर्शन
बाळूमामांची मला आलेली प्रचिती
२००५ ची हकीकत आहे, माझे लग्न होऊन लगबग एक महिनाच उलटलेला होता. बाळूमामांची मेंढरं आमच्या गावात आली होती, तेव्हा मला एका व्यक्तीने सांगितले की, तुमचे नवीन लग्न झालेले आहे, तुम्ही जोडीने बाळूमामाच्या मेंढरांची पूजा करा म्हणजे तुम्हांला बाळूमामांचा आशीर्वाद लाभेल आणि तुमचा संसार सुखाचा होईल. तेव्हा मी त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि सर्वकाही विसरून गेलो. त्यावेळी बाळूमामा कोण होते? बाळूमामांचे महत्त्व काय होते? काहीच माहित नव्हते. नकळ का होईना पण पातक घडले होते. न कळत घडलेल्या गोष्टी माणसांना सहज आठवत नसतात. माझ्याही बाबतीत तसेच झाले, मी सर्व काही विसरून गेलो होतो. २००५ ते २०१४ या ९ वर्षांच्या दीर्घ कालावधीत माझा संसार कधीच सुखाचा झाला नाही.
मला व्यवसायात, नोकरीत अपयशच येत गेले. माझी कोणतीही नोकरी सहा महिने वर्षभरच टीकायची. माझ्या संसाराची गाडी आणि नोकरीच्या यशाची गाडी कधीच रुळावर आलेली नव्हती. मी माझ्या कुटुंबाला सुरळीत चालविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होतो. पण सर्व काही व्यर्थ जात होते. मला व माझ्या कुटुंबाला देवाचा कृपाशीर्वाद मिळावा, म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांची उपासना करायचो. सर्व काही करण्याचे मार्ग होते ते करून झाले. मला ह्या सर्व गोष्टींचा काहीच फायदा होत नव्हता. यामुळे उलट मनाचे अजून खच्चीकरण होत होते. पूर्ण दमून गेलो होतो, मनात अनेक वाईट विचार येत होते. शेवटी, बुडणाऱ्याला काठीचा आधार म्हणून मी देवाला विनवणी केली की, माझ्या हातून जर काही नकळत चूक झाली असेल तर मला तुम्ही योग्य मार्ग दाखवावा. ऑगस्ट २०१४ साली मला मामांनी योग्य मार्ग दाखविला. मला कोल्हापूर जिल्ह्यासाठी नोकरीची संधी मिळाली.
बाळूमामांचा मला मिळालेला कृपाशीर्वाद
मी कामाच्या निमित्ताने माझ्या सहकाऱ्याबरोबर निघालो होतो. रस्त्याने जाताना एक मोठे मंदिर लागले, माझ्या सहकाऱ्याने सांगितले हे बाळूमामांचे समाधी मंदिर आहे. "बाळूमामा" हा शब्द उच्चारता क्षणी मला विसरलेल्या सर्व काही गोष्टी आठवल्या.
नंतर मी खास दर्शनासाठी आदमापूरला गेलो. मंदिरात प्रवेश करताच माझे लक्ष समोर असलेल्या बाळूमामाच्या मूर्तीकडे गेले. मूर्ती खूप आकर्षक आणि सुबक आहे. जेव्हा मी पहिल्यांदा बाळूमामाच्या मूर्तीचे दर्शन घेतले तेव्हा मला मूर्तीच्या डोळ्यातील चैतन्य व जिवंतपणा अनुभवायला मिळाला होता. काही क्षणांसाठी माझे हृदय आणि डोळे भरुन आले होते, माझे संपूर्ण शरीर घामाने डबडबून गेले होते. काही काळ माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते फक्त स्थब्ध उभा राहिलो होतो. मी थोडावेळ स्तब्ध अवस्थेतच उभा राहिलो, काही मिनिटांनी मला माझ्या अस्थित्वाची जाणीव झाली. पुढे जाऊन बाळूमामांचे दर्शन घेऊन बाहेर पडलो.
मामांच्या दर्शनानंतर माझ्या अंगात वेगळेच चैतन्य निर्माण झाले, माझ्या मनावरचा ताण कमी होतानाची जाणीव मला होत होती, मरगळ निघून गेली होती आणि माझे मन एकदम प्रसन्न झाले होते. मला बाळूमामांचा कृपाशिर्वाद लाभलेला होता, माझ्या कारकिर्दीच्या यशाचा मार्ग मोकळा होत गेला आणि कुटूंबातील समस्या सुटत गेल्या. नोव्हेंबर २०१४ पासून ते आजपर्यंत मला माझ्या कामात येणाऱ्या कोणत्याही अडचणी मामांच्या आशीर्वादामुळे सहज सुटत गेल्या. कठीण वाटणार्या गोष्टींमध्ये ही मला सहज यश मिळत गेले. आज बाळूमामांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच माझ्यासाठी कठीण वाटणाऱ्या गोष्टी सोप्या होत आहेत.
आता २०२३ सुरु आहे अजूनसुद्धा बाळुमामांची कृपा असलेली दिसत आहे. अनेक अडचणी आल्या परंतु बाळुमामाच्या कृपेमुळे सहज पार पडल्या. संकट मोठी असूनसुद्धा सहज पार पडली. तुम्हाला मी एक दोन उदाहरणे देऊन सांगतो. कोरोनाच्या काळामध्ये मी ब्लॉगिंग करायला सुरुवात केली. ब्लॉग काय असतो आणि तो कसा लिहायचा इथपासून सुरुवात होती माझी. कसातरी ब्लॉग लिहायला सुरुवात केली, २५ ते ३० पोस्ट लिहिल्या आणि गूगल ऍडसेन्स Approve साठी सबमिट केला. परंतु माझ्या ब्लॉगला मान्यता काही केल्या मिळत नव्हती. मी अनेक वेळा प्रयत्न करत होतो प्रत्येक वेळेस मला निराशाच पदरात पडत होती. मित्रांनो मी कंटाळलो आणि विषय बंद करायचा विचार केला. कारण गेले एक वर्ष मला गूगल ऍडसेन्स कडून काही केल्या मान्यता मिळत नव्हती.
मनी ध्यानी काही न ठेवता मी अदमापूरला बाळुमामाच्या दर्शनाला गेलो. मी आणि माझी बायको सोबत होती, दर्शन घेऊन घरी आलो. साधारण एक आठवडा निघून गेल्यावर माझ्या डोक्यात अचानक ब्लॉगिंगचा पुन्हा विचार येऊ लागला. परंतु आधीच अनेक वेळा निराशा पदरात पाडल्यामुळे बिचकत होतो. नंतर मी असा विचार केला की, आपण आठ दिवसांपूर्वी बाळूमामांचा आशीर्वाद घेऊन आलो आहोत. तर त्यांची इच्छा समजून प्रयत्न करू, संध्याकाळी मी ब्लॉग गूगल ऍडसेन्सला मान्यतेसाठी सबमिट केला.
हे वाचा :अष्टविनायक दर्शन यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी
नेहमी प्रमाणे मी सकाळी उठून लॅपटॉप उघडला आणि माझ्या ब्लॉग पाहायला पाहतोतर काय माझ्या ब्लॉगवर गूगलच्या जाहिराती दिसत होत्या. माझा माझ्यावर विस्वास बसत नव्हता. कारण मी ब्लॉगमध्ये कोणतेही बदल न करता गूगल कडे मान्यतेसाठी पाठवला होता. तो हाच ब्लॉग होता जो बाळुमामाच्या कृपाशिर्वादापूर्वी गूगल मान्यता देत नव्हते आणि बाळुमामाचे दर्शन घेऊन आल्यावर त्याच ब्लॉगला एका रात्रीत मान्यता मिळते. हे काय कोणत्या चमत्कारापेक्षा माझ्यासाठी कमी नव्हते. हे सर्व बाळूमामांनी घडवून आणले होते.
अजून एक गोष्ट म्हणजे ज्याला ब्लॉगिंग काय असते हे माहीत नसताना सुद्धा माझा ब्लॉग गूगल च्या पहिल्या पेज वर दिसतो, रँक होतो, रँकिंगसाठी भले भले धडपडत असतात. मी रँकिंगसाठी कोणतेही टूल वापरत नाही. बाळूमामा सोबत असतील तर कितीही मोठी संकटे येउदेत सहज पार पडतात. मित्रानो मला अनेक अनुभव आहेत परंतु सगळेच सांगत बसलो तर वेळ पुरणार नाही.
बाळूमामाचा संदेश
बाळूमामाचा संदेश साधा पण शक्तिशाली होता. सर्व माणसे समान आहेत, मग त्यांची जात-धर्म असो, असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी प्रेम आणि करुणेचा उपदेश केला आणि त्यांच्या शिकवणींनी गरजूंना मदत करण्याच्या महत्त्वावर जोर दिला.
बाळूमामा हे प्राण्यांच्या हक्कांचेही पुरस्कर्ते होते. मेंढपाळ या नात्याने, त्यांना सर्व प्राण्यांबद्दल मनापासून आदर होता आणि त्यांचा विश्वास होता की मानवांवर प्राण्यांचे संरक्षण आणि काळजी घेण्याची जबाबदारी आहे.
बाळूमामाचा वारसा
बाळूमामाच्या शिकवणीचा महाराष्ट्रातील लोकांवर खोलवर परिणाम झाला. त्यांनी त्यांच्या काळातील जातीय अडथळे दूर केले आणि ते आशा आणि एकतेचे प्रतीक बनले. त्यांनी विविध जाती आणि धर्मातील लोकांना एकत्र येण्यासाठी आणि समान ध्येयासाठी कार्य करण्यास प्रेरित केले.
संत आणि समाजसुधारक म्हणून आज बाळूमामाचे स्मरण केले जाते. त्यांच्या वारशाने महाराष्ट्रातील आणि त्यापलीकडे अनेक लोकांना जातीभेदाविरुद्ध लढण्यासाठी आणि अधिक न्यायी आणि समान समाजासाठी कार्य करण्यास प्रेरित केले आहे.
निष्कर्ष
बाळूमामा आदमापूर हे एक आदरणीय संत आणि आध्यात्मिक नेते होते ज्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले.बाळूमामांना नम्रता, करुणा आणि शहाणपणासाठी ओळखला जात असे, ज्यांनी असंख्य लोकांना त्यांच्या शिकवणींचे पालन करण्यास आणि सद्गुणपूर्ण जीवन जगण्यास प्रेरित केले. बाळूमामाचा वारसा त्यांनी स्थापन केलेल्या असंख्य सेवाभावी कार्ये आणि अध्यात्मिक संस्थांद्वारे चालू आहे, ज्या सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीच्या लोकांसाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा स्त्रोत म्हणून काम करत आहेत. त्यांचे जीवन नि:स्वार्थीपणाचे आणि उच्च कारणासाठी भक्तीचे एक चमकदार उदाहरण आहे आणि त्यांच्या शिकवणी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू पाहणार्यांचे जीवन समृद्ध करत आहेत. बाळूमामा आदमापूर हे अंधारात प्रकाशाचे दिवाण म्हणून, येणाऱ्या पिढ्यांसाठी खरे आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सदैव स्मरणात राहतील.
हे वाचा : तिरुपती बालाजी मंदिर
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१)बाळूमामाचा जन्म कधी झाला?
बाळूमामाचा जन्म ३ ऑक्टोबर १८९२ रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ नावाच्या गावात हिंदू धनगर (मेंढपाळ) कुटुंबात झाला.
२)बाळूमामाचा संदेश काय होता?
बाळूमामाच्या संदेशात प्रेम, करुणा आणि गरजूंना मदत करण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला. सर्व माणसे समान आहेत, मग त्यांची जात-धर्म कोणताही असो, असा त्यांचा विश्वास होता.
३)बाळूमामाचे स्मरण समाजसुधारक म्हणून का केले जाते?
बाळूमामा यांनी त्यांच्या काळातील जातीय अडथळ्यांना झुगारून दिले आणि ते आशा आणि एकतेचे प्रतीक बनले. त्यांच्या वारशाने महाराष्ट्रातील आणि त्यापलीकडे अनेक लोकांना जातीभेदाविरुद्ध लढण्यासाठी आणि अधिक न्यायी आणि समान समाजासाठी कार्य करण्यास प्रेरित केले आहे.
४)बाळूमामाचा प्राण्यांबद्दलचा दृष्टिकोन काय होता?
मेंढपाळ म्हणून बाळूमामाला सर्व प्राण्यांबद्दल खूप आदर होता. त्यांचा असा विश्वास होता की मानवांवर त्यांचे संरक्षण आणि काळजी घेण्याची जबाबदारी आहे. बाळूमामाच्या शिकवणीत सर्व सजीव प्राण्यांशी दयाळूपणे आणि करुणेने वागण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आणि ते प्राण्यांच्या हक्कांसाठी एक मुखर वकील होते.
५) बाळूमामा चे पूर्ण नाव काय?
बाळूमामा चे पूर्ण नाव बाळाप्पा मयाप्पा आरभावे असे आहे. त्यांच्या आईचे नाव सुंदरा होते.
६) बाळूमामा देवस्थान कुठे आहे?
बाळूमामा देवस्थान कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे आहे.
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'
अस्वीकरण
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्कप्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. अशा सर्व प्रतिमा त्यांच्या संबंधित मालकांचे कॉपीराइट आहेत आणि आम्ही जिथे जमेल तिथे त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्न करतो. तथापि, जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
Post a Comment